Monday, August 23, 2010

मोठेपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... ह्या सुभाषीतावर दुमत व्हायचं कारण नाही. मोठी माणसे (वयानी) नेहमी बालपणाचं कौतुक करताना दिसतात. मी देखिल त्याला अपवाद नाही. लहानपणी काय कसलाच ताण नाही. दररोज ऑफ़िसला जाणं, घरासाठी खरेदी करणं, बिलं भरणं, कर्जांचे हप्ते, मुलांच्या शाळा, त्यांचं संगोपन, आयकर भरणं, इतर जबाबदाऱ्या कसलही टेन्शन नाही. आरामात आयुष्य जगण्याचा खरा आनंद केवळ बालपणात लुटता येतो.

प्रौढावस्थेतून बालपणात परतण्याचं एखादं यंत्र असतं तर काय मजा आली असती नाही? पण प्रामाणिकपणे विचार केल्यास किती प्रौढांना परत बालपणात जावसं वाटेल? प्रौढांवर अनेक जबाबदाऱ्या असतात हे मान्य. पण वयानुसार येणारा अनुभव आणि आदर लहान मुलांना खरच मिळतो का? एखादं कटकट करणारं कार्ट आपण हिडिस फ़िडिस करुन हाकलून लावू शकतो, लहान वयात मुलांना विशेष आदर देण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण आपण लहान असताना कुणी आपल्याशी असं वागतं तेव्हा खरच आपल्याला आवडतं का? बरं तुच्छतेने वागणारा आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्याची चुक असून देखिल वयोमानानुसार उलट उत्तर देता येत नाही. पण एखाद्या प्रौढाशी आपण तसं सहसा वागू शकतो का? अनेक कर्तुत्व करण्याचं कौशल्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचं सामर्थ्य हे प्रौढावस्थेतच येतं.

लहानपणी रोजची शाळा, अभ्यास, आई वडिलांचा धाक, अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून न करता येणं आणि आजच्या वातावरणातला ताण यासारख्या जबाबदाऱ्या, न कळता का होईना, असतातच. शाळेत अव्वल येण्यासाठी, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लहानपणी देखिल असह्य ताणं झेलावा लागतो. प्रौढांप्रमाणे हवी ती वस्तू विकत घेणे, वाटेल तेवढा वेळ टि.व्ही. बघणे, कुठल्याही वयोगटाशी कुठल्याही विषयावर चर्चा करणे या सारख्या मोठीपणी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी लहानपणी सहसा वर्ज्य असतात. थोडक्यात म्हणजे लहानपण हे स्वातंत्र्याला पारखं असतं. स्वातंत्र्य असायला हवं की नाही हा इथे मुद्दा नाही. पण साधारणत: ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. ५-६व्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते "क्युट" या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्ह्यायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. "लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक", असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विषेश अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सुचीत करायचं नाहीये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला ६ महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदाऱ्या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा  उगिचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षीतो? बहुदा या भावेनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.

माझे बालपण अतिशय त्रासात गेले असे नाही. तेही चारचौघांसारखेच होते. पण त्यावेळी लवकर मोठे होण्याची फ़ार इच्छा होती. आता (वयाने) मोठा झाल्यावर बालपणातल्या आठवणीत कधीकाळी रमायला आवडतं, पण परत लहान होणं? नको रे बाबा... मोठेपण ठेवा देवा...

Tuesday, June 22, 2010

मोडेन, पण...

तो.. वक्तशीर, नोकरीत रुजू झाल्यापासून २३ वर्षांत एकदाही उशीरा ऑफ़िसमध्ये गेला नाही. एकही सिक लिव्ह घेतली नाही. एक दिवस, काही अनियंत्रित कारणामुळे १५ मिनिटे उशिरा आला. चुक त्याची नव्हती. उशिर झाला होता हे मात्र खरं. साहेबांनी "लेट-मार्क" लावलं. त्याच्याकडून निषेध झाला. साहेबांनी ऐकलं नाही. २३ वर्षांचा हवाला देऊनही उपयोग झाला नाही. तो आमरण उपोषणावर गेला. बायको, मुलं, मित्र, सहकर्मचारी यांनी समजावून पाहिले. त्याने ऐकले नाही. ३० व्या दिवशी अशक्त होवून त्याने प्राण सोडले. कंपनीने प्रकरण विनाकारण ताणून धरल्यामुळे साहेबांना बर्खास्त केले.


त्या दोन कुटुंबांत पारंपारिक वैमनष्यं. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं. नविन पिढी आधुनिक. त्यातील एका कुटुंबातील मुलगा शिकायला परदेशी गेला. या वैमनष्याचा त्याला तिटकारा. मायदेशी परतल्यावर शत्रूपक्षाच्या समवयस्क मुलाला नदीन पडून मरता मरता वाचवले. दोन्ही कुटुंबांना ही बातमी कळली. ज्याला वाचवण्यात आले त्या मुलाचा त्याच्याच वडिलांनी खून केला. आपला मुलगा मरता मरता वाचला या आनंदापेक्षा, तो "त्या" कुटुंबाच्या एका सदस्याने उपकार केले म्हणून वाचला, ही वस्तूस्थिती जास्त सलणारी होती.


स्वातंत्र्यपुर्व भारतातील एका राजेशाही घराण्यातला त्याचा जन्म. देश संघटीत झाल्यानंतर होतं नव्ह्तं ते सगळं नेलं. सोन्याच्या झारीतून दुध प्यायलेला तो, आज दुध विकत घेण्याची ऐपत नव्हती. त्यांच्याच महालातील एक पारंपारिक नौकरांचं कुटुंब. स्वातंत्र्यानंतर नशिब बदललं. लहानश्या कापडाच्या दुकानाचं मोठ्या उद्योगात रुपांतर झालं. जुन्या ‌ऋणानुबंधामुळे त्या कुटुंबाने त्याला एका उच्च पदावर नोकरी बहाल केली. पण त्याने उर्वरित आयुष्य गल्लो-गल्ली भिक मागत काढलं.


परिवारातील सर्व पुरुष सदस्यांनी सशस्त्र सेनेत भरती व्हावं हा अट्टाहस. त्याचं मन संगीतात रमलेलं. लहानपणापासून मिळालेले बाळकडू, साम-दाम-दंड-भेद हे सुद्धा त्याला रोखू शकले नाहीत. प्रौढ झाल्यावर त्याने सहन न होवून घर सोडलं. वडिलांनी संबंध तोडले. काही वर्षांतच तो एक नावाजलेला संगीतकार झाला. परदेशी एका कार्यक्रमासाठी जात असताना विमान अपघातात अनेकांबरोबर प्राणांस मुकला. सरकारने अनेक वर्षांनी मरणोत्तर "पद्मश्री" जाहीर केला. त्याच्यावतिने पुरस्कार एका मित्राने स्विकारला.

Monday, May 10, 2010

काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं


परत एकदा पक पक पकाक बघत होतो. त्यात मधेच एक दु:खी पण अप्रतिम अशी ओळ आहे... "काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं, फ़िरून उकरावं, कशापायी?" माझ्या या पोस्टचा आणि चित्रपटातील प्रसंगाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मग संदर्भ सोडून हे वाक्य मी का निवडलं? तर काळाच्या मुठीतून जे निसटून गेलं आहे ते परत उकरुन काढण्यासाठी!

आजच्या माहिती तंत्रद्यानाच्या जगात बऱ्याचश्या मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा उकरुन काढता येतात. उदाहर्णार्थ जुन्या जाहिराती. मध्यंतरी "युट्युब" वर वेळ घालवताना अर्थात टि.पी. करताना काय काय सापडलं म्हणून सांगू! गोंडस पारशी मुलाची "जलेबी" वाली धारा तेलाची जाहिरात... अजन्ता घडाळ्याच्या ठोक्याना ताल देणारी आजी.. एशियन पेंटसची जवान सिमेवरून परत येतो आणि आरती घेताना आपल्या मुलाच्या हातावरून हात फ़िरवतो... फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीतर विचारायलाच नको! पारले जी ची "हमको पता है जी" वाले आजोबा आणि नातवंडं....इथपासून तर बुलंद भारत की बुलंद तस्वीर.....हमारा बजाज पर्यंत... खोटं वाटेल... पण अक्षरशह: डोळ्यातून पाणी आलं... का ते कळलं नाही. काळच्या ओघात वाहुन गेलेलं निरागस बालपण आठवल्यामुळे असेल कदाचीत....

तर हिप्नोटाईज्ड झाल्यासारखा मी एकामागून एक व्हिडीयोज बघायला लागलो. "एक चिडीया" आणि "मिले सुर मेरा तुम्हारा" बघुन तर लहान मुले कार्टुन बघताना करतात तसा माझा चेहरा झाला होता:) "पूरबसे सुर्य उगा" वाली साक्षरता मिशनची जाहीरात बघून खरच सरकारी माध्यमांचं कौतुक करावसं वाटलं. त्याकाळी मोजकी साधनं असुनही जनजागृतीची ही अप्रतीम जाहिरात त्यानी बनवली होती.

ही पोस्ट केवळ जुन्या जाहिरातींबद्दल नाही. काही जीव्हाळाच्या गोष्टी; ज्यांचा कालांतराने त्या कालबाह्य झाल्याने विसर पडला, त्या उकरुन काढण्यासाठी ही पोस्ट. त्यापैकी काहींची यादी खालील प्रमाणे....

लहान मुलांसाठी असलेलं एकमेव मराठी कॉमिक्स...... "चांदोबा"

डस्टर-पिंजर-खार-कबुतर-ढोली असला "रॉक-पेपर-सिझर" चालीवरचा मराठी खेळ (मी कबुतरला खब्बुतर म्हणत असे कारण खार म्हंटल्यावर कबुतर पेक्षा खब्बुतर म्हणणं सोपं पडे :))

मुलींकरता असलेला खेळ.....भुलाबाई (मी लहान असताना माझ्या बहिणीबरोबर जात असे. भुलाबाईचे गाणे थोडे थोडे अजुनही आठवतात. त्यात अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता.... भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असल्या चालीवर एक यमक जुळणारं गाणं होतं, ते माझं "फ़ेव्हरेट"!)

कंचे (कंचे म्हणजे खेळण्यातले काचेचे मार्बल्स) आणि कंच्यासारख्याच पण पांढऱ्या, दगडी आणि मोठ्या असलेल्या पखांड्या.

अंधळी कोशींबीर... (हि बहुदा अजुनही खेळली जाते)

डोंगराला आग लागली पळा पळा नावाचा एक मैदानी खेळ होता.... तो कसा खेळतात ते आता आठवत नाही :(


आमलेट की चॉकलेट हा ७ चौकट आखुन खेळाला जायचा. त्याची रचना
 खालीलप्रमाणे होती.



क्रमाक्रमाने एक एक रकान्यान दगड टाकत जायचा आणि ज्या रकान्यानत दगड असेल त्या रकान्याशिवाय उरलेल्या रकान्यात लंगडी घालत जायचं आणि परत यायचं. दगड ठरलेल्या रकान्याच्या बाहेर गेला किंवा दोन्ही पाय जमिनीला टेकले की खेळाडू बाद!

उन्हाळ्यात पाहुणे घरी आले कि दुपारी ठरलेला खेळ..... व्यापार आणि पट (होय...तोच शकुनी मामावाला). शिवाय सत्ते लावणी, पाच-तिन-दोन, रमी हे ही होतेच.

पावसाळ्यात मामाच्या गावी एक "खुपसणी" नावाचा खेळ असायचा. लोखंडाची सळाख दुर फ़ेकायची. ओल्या जमिनीमुळे ती आत खुपसायची म्हणून खुपसणी!

युनिसेक्स खेळ.... लगोरी.

सर्वात लोकप्रिय हिंदी कॉमिक्स.... चाचा चौधरी (चाचा चौधरी का दिमाग कॉम्प्युटरसेभी तेज चलता है! :))

दुरदर्शन वरिल गाजलेल्या मालिका..... चंद्रकांता, स्कूल डेज, सॅम और गोपी वाली तहकीकात, पंकज कपूर ची फ़टीचर आणि करमचंद जासुस, अलिफ़ लैला, अफ़साने, इ. इ.

सध्या इतकाच.... तुम्हाला आठवलं असं काही तर मलाही कळवा!

Monday, May 3, 2010

भेटवस्तू

आटपाट नगर होतं. सम्पन्नं, समृद्धं आणि निटनेटकं. नगराचा राजा हा अतिशय गुणी, सज्जन आणि शांतीप्रिय होता. त्याला आपल्या प्रजेवर स्वत:च्या मुलासारखे प्रेम होते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे तो प्रजाजनांचा सांभाळ करत असे. प्रजादेखिल अत्यंतं सुखी होती आणि राजाला देवाप्रमाणे पुजत असे.

राजाचा वाढदिवस होता. संपूर्ण आटपाट नगर फ़ुलांनी सजवण्यात आलं होतं. ठिकठिकाणी राजाच्या सन्मानार्थ कार्यक्रम ठेवले गेले होते. दुरदुरच्या नगरांतून येऊन लोक आपली कला सादर करीत होते आणि राजाकडून भरघोस पारितोषिकं घेऊन जात होते. आपल्या प्रजाजनांचं प्रेम बघून राजाला अगदी भरुन येत होतं.

दिवस मावळत आला होता. राजा आपल्या माहालाकडे निघाला होता. तेवढ्यात वाटेत एक भिकारी राजासमोर आला. शिपायांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण राजाने त्यांना अडवले आणि भिकाऱ्याला आपल्याजवळ बोलावले. दिवसभर भिक मागून मागून तो दमला असल्याचे राजाला लक्षात आले. त्याची झोळी धान्यांनी जवळजवळ पूर्ण भरली होती. तो सकाळपासून राजाला भेटण्याचा प्रयत्न करत होता.

हे ऐकून राजाने एका शिपायाला त्याला १०० सुवर्ण मोहोरा दान देण्यास सांगितले. पण भिकारी म्हणाला, "नाही महाराज, मी दान घेण्यासाठी आपली वाट बघत नव्ह्तो. आज आपला वाढदिवस. आपल्या सारखा राजा या नगरीला लाभला हे आमचं सौभाग्य. आपल्या वाढदिवसानिमीत्त आम्ही आपल्याला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे." हे ऐकून राजाला नवल वाटले. यापुर्वी कुणीही असे काही बोलले नव्हते. प्रजाजनांचीही चूक नव्हती. शेवटी राजाच तो, त्याला प्रजा काय बरं भेटवस्तू देणार?

राजा उत्सुकतेने म्हणाला, "ठिक आहे, पूर्ण दिवस मी इतरांना भेटवस्तू दिल्यात. तु शेवटचा मला भेटतो आहेस, तर तुच मला भेटवस्तू दे." राजाने हात पुढे केले. भिकाऱ्याने आपल्या झोळीतून एक मुठ धान्य राजाच्या हातावर ठेवले. ते पाहून राजाने मंद स्मित केले. तेवढ्यात भिकाऱ्याने पुन्हा आपला हात झोळीत घातला आणि आणखीन एक मुठ राजाच्या हातावर ठेवली. राजा आश्चर्यानी बघायला लागला. त्या झोळीतील धान्य हे कदाचीत त्या भिकाऱ्याचं पुढल्या काही दिवसांचं अन्न होतं. त्यानंतर आणखी एक मुठ, अजुन एक, अजुन एक, धान्य राजाच्या हातातून जमिनीवर सांडायला लागलं. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहु लागले. एक एक करता त्या भिकाऱ्याने आपली संपुर्ण झोळी राजाच्या वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून रिकामी केली आणि तो आपल्या मार्गाने निघुन गेला.

(समाप्त)

=========================================

ता.क.: हि कथा माझी नाही आणि मी ती कुठल्याही ब्लॉगवरूनही उचलली नाही. लहानपणी कधीतरी वर्तमानपत्रातील बालविभागात वाचण्यात आली होती. दिड दशकं जाऊनही ही कथा अकारण माझ्या मनात घर करून बसली. ती पुर्णपणे आठवत नसली तरी शेवट असाच होता.

Sunday, May 2, 2010

वेगळा (भाग: २)

घरी पोहोचल्यावर एक दोन दिवसांचे प्लॅन्स झाले. तीचा भाऊ कामात व्यस्त असल्याने पुढचे बरेचसे दिवस त्या दोघांनाच फ़िरायचे होते. त्याला तर ह्या गोष्टीचा विलक्षण आनंद झाला होता. जसे जसे दिवस जाऊ लागले, त्याला तिचे रोज एक नवे रूप दिसू लागले. मनसोक्त भटकताना, गप्पा मारताना आणि हवा तसा श्रोता मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. दिवसोंदिवस ती त्याला अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या चेहऱ्या सकाळचा ताजेपणा होता.

असेच एकदा बोलता बोलता तिने विषय काढला. स्वत:च्या जगावेगळ्या आवडी निवडींबद्दल. प्रत्येक बाबतीत असेली मतांची तफ़ावत... छंद... जीवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन आणि मानसिक द्वंद्वातून आलेली मरगळ.... जणूकाही त्याचं प्रतिबिंबच. तिची व्यथा त्याला चटकन लक्षात आली. त्याला तिच्याबद्दल साहनूभुती तर वाटलीच, पण जगात आपण एकटेच असे नाही ह्याचा कुठेतरी एक स्वार्थी आनंदपण झाला. त्याने लगेच तसले विचार झटकून टाकले. बिचकत बिचकत स्वत:बद्दल देखिल सांगीतले. इतक साधर्म्य एकून क्षणभर तिचा विश्वासच बसेना. हा आपली थट्टा तर करत नाहीये ना? करत असल्यास फ़ार वाईट थट्टा आहे, असले विचार तिच्या मनात येऊन गेले. पण एव्हाना त्याच्या डोळ्यात पाणी तरारले होते. तो खरं बोलतोय हे तिच्या लक्षात आले.

एकमेकांचे अनुभव ऐकल्यावर दोघांनाही एकमेकांबद्दल वाईट वाटले. पण असं का? आपण असे का? ह्यात आपली काय चूक? सगळॆ करतात तेच आपणही केलच पाहिजे असा अट्टाहस का? जरी कुणी प्रत्यक्ष विरोध किंवा उपरोध केला नसला तरी एक अप्रत्यक्ष सामाजीक तणाव कशासाठी? अर्थात, ह्या प्रश्नांची उत्तरं दोघांकडेही नव्हती. तरीही, आलिया भोगासी असावे सादरं, हे काही त्यांना पटत नव्हतं. आपली परिस्थीती बदलावी, आपण आनंदी आयुष्यं जगावं, मित्रमैत्रिणींमध्ये एकरुप व्हावं असं दोघांनाही वाटत होतं.

यावर त्याने एक तोडगा सुचवला. अनेक दिवस त्याच्या डोक्यात हा विचार घुटमळत होता. "आपण एकदा मानसिकरोगतज्ञाकडे जाऊन बघुया का?" त्याच्या ह्या प्रश्नाने ती तिन ताड उडालीच! "काय??" आपण वेगळे म्हणजे मानसिक रोगी?? तिला गरगरायला लागलं. ति थोडावेळ काहीच बोलली नाही. धक्का सावरल्यावर काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला, "हे बघ चक्रावू नकोस. माझ्या वाचण्यात एक लेख आला होता. त्यात दिलेल्या काल्पनिक उदाहरणाशी आपला स्वभाव तंतोतंत जुळतो. बरेच दिवसात ह्या बाबतीत कुणाचातरी सल्ला घ्यावा असं वाटत होतं. पण आपल्या देशात मानसिकरोगतज्ञाकडे जाणे म्हणजे स्वत:ला पागल सिद्ध करण्यासारखं आहे. अनायसे हि संधी आपल्याला मिळाली आहे. आयुष्य रुळावर आणण्यासाठी जर डॉक्टरला भेटावं लागत असेल तर ही फ़ार छोटी किंमत आहे." हे सर्व ऐकल्यावर ती गंभीर झाली. आयुष्य बदलावं अस तिलाही वाटत होतं. आणि तोही तिच्यासारखाच असल्याने तिचा विश्वास बसला आणि त्यांनी प्रयत्नं करायचं ठरवलं.

भावाला सांगावं की नाही हादेखिल प्रश्नं होताच. पण तो तिथला स्थानिक असल्याने त्याची मदत होवू शकते आणि हि पायरी चढताना कुटुंबातील एखाद्या सदस्याला ठावूक असणे गरजेचे आहे हे दोघांनाही पटले. त्याच रात्री घरी ह्यावर चर्चा झाली. तिच्या भावाला जरी हे सगळं निरर्थक वाटत होतं, पण आपल्या बहिणीच्या डोळ्यातील पाणी बघुन त्याला परिस्थीचा अंदाज आला आणि त्याने एक तज्ञ सुचवला. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती दोघे तज्ञाकडे रवाना झाली. सुमारे तास दोन तासांच्या कंसल्टेशन नंतर एक विचित्र बातमी त्यांना मिळाली. त्याची भिती खरी होती. त्या दोघांना एक विचित्र मानासिक आजार होता. त्यांच्या वयक्तीक आणि व्यवसायीक दुर्गतीस कारण त्यांचं वेगळेपण नसून हा आजार होता. धरसोड व्रुत्ति, ठरवलेल्या गोष्टी पुर्णत्वास न नेणे, आपल्याच मतांचा होणारा घोळ, स्वत:ला नक्की काय हवयं ते न कळणे आणि जोडीला अत्यंतं लहरी स्वभाव, ही सर्व लक्षणं होती "बायपोलर डिस-ऑर्डरची". दुर्मिळ नसणारा पण प्रखरता सहसा कमी असणारा हा मानसीक आजार त्यांना वेढून होता. आजार होण्यामागचं कारण हे जेनेटीक असल्याने नक्की दोष कुणालाही देता येत नव्हता.

आपल्याला मानसिक रोग आहे हे कळल्यावर तिला रडूच कोसळले. पण इतर मानसिक रोगांप्रमाणे हा समाजोप्रदवी रोग नसून थोडे व्यायाम आणि औषधी यांनी आटोक्यात ठेवता येतो हे ऐकल्यावर दोघांनाही हायसं वाटलं. डॉक्टरचं बोलणं आठवून ती दोघे स्वत:च्या स्वभावाबद्दल, आयुष्यातील चुकांबद्दल आणि सद्यपरिस्थीबद्दल विचार करु लागली. हळु हळु समिकरणं जुळु लागली, कारणं सापडू लागली आणि स्वत:बद्दलचा अनादर कमी होवू लागला. एक विलक्षण आत्मविश्वास त्यांना जाणवू लागला आणि यापुढे आयुष्य सुखात जाणार, कमितकमी आपण तसा प्रयत्न करणार, आपण चारचौघांसारखेच आहोत, जे आपल्याजवळ आहे त्यातच सुख भोगु वगैरे वगैरे लाखो विचार त्यांच्या मनात यायला लागले. गमतीची गोष्टं म्हणजे, हा मानसीक रोग काही फ़ायदेपण देतो असं डॉक्टर म्हणाल्याचं त्यांना आठवलं. कलेची आवड असणाऱ्यांना या रोगचा जास्तच फ़ायदा मिळतो. जगातील अनेक थोर कलावंत या रोगाने त्रस्त होते, पण ह्या रोगानी त्यांना बहाल केलेल्या "वेगळेपणा" मुळेच ते समाजात उठुन दिसले आणि यशस्वी झाले!

सुट्टी संपली आणि ती दोघे भारतात परतली. पूर्णपणे बदलून, प्रचंड आत्मविश्वास घेऊन आणि आता पर्यंत जे जे गमावलं ते परत कमवायला. दोघेही हुशार होतीच. हळु हळु नोकरीतही त्यांच्या बदलेल्या स्वरुपाची दखल घेतल्या जाऊ लागली. सोन्यावरची धुळ उडाल्याने सोनं लखलखून चकाकू लागलं. आपल्यातला वेगळेपणा हा श्राप नसून वरदान आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या ह्या क्षमतेचा वापर करुन उत्तुंग भरारी घेण्याकरिता नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय थाटला. थोड्याच कालावधीत आपल्या क्षेत्रात त्यांनी चांगलाच जम बसवला. अपेक्षेप्रमाणे ती दोघे केवळ व्यवसायीक भागीदार न राहता आयुष्याचीही भागीदार झाली.

काही वर्षांतच तो एक यशस्वी उद्योजक म्हणून नावजला. अनेक बिझनेस स्कूल्समध्ये त्याला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावण्यात येऊ लागले. प्रत्येकवेळी लेक्चर संपल्यावर तो एक वाक्य सांगायला विसरत नसे, "इतिहास तेच घडवतात जे वेगळा विचार करु शकतात. चौकटी बाहेर विचार फ़ार कमी लोक करु शकतात. जगात सरळ रस्त्यावर चालणारे तुम्हाला बरेच भेटतील, पण वाकडी तिकडी का होइना, पण स्वत:ची वाट बनवणारे आणि स्वत:च्या इष्टस्थळी पोहोचणारे फ़ार कमी असतात." 

==========================================

(समाप्त)

Monday, April 19, 2010

वेगळा (भाग: १)

तो जरासा वेगळाच होता. जवळपास प्रत्येक बाबतीत. इतका की आजुबाजुच्यांना त्याचं वागणं कृत्रिम वाटायचं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या आवडी निवडी भिन्न आहेत हे केवळ स्वत:ला महत्वं प्राप्त करून देण्याकरता तो असा वागतो असं सर्वांना वाटायचं.

त्याला क्रिकेट आवडत नसे. गोड पदार्थांना तो नाक मुरुडत असे. जेवणात तूप बघितलं की त्याला घास जात नसे. ऐन उमेदीच्या काळात इतर मुलांप्रमाणॆ कर्कष्यं आवाजाची गाणी, डिस्को, पब्स, आवडलेल्या मुलीशी कमितकमी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, उछंद भटकणे, काही प्रसंगी धाडसीपणे वागणे असल्या गोष्टींमध्ये त्याला कधी रसच नव्हता. शाळेनंतर देखिल इतर मित्रांप्रमाणे प्रचलीत शिक्षणक्षेत्र निवडण्यात त्याला कधीही उत्साह नव्ह्ता. त्याच्या असल्या स्वभावामुळे तो बरेचदा एकटाच असायचा.

पौगांडावस्थेत त्याला आपल्यातील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवायला लागला. आपल्या आसपासच्या मर्यादित विश्वात स्वत:ला सामावून घेण्याचे अनेक असफ़ळ प्रयत्न त्यानी केले. इच्छा नसताना क्रिकेटची मॅच बघणे. मोठ्या आवाजात गाणी ऐकणे वगैरे. पण असल्या प्रकारात तो कधी रमलाच नाही. आडातच नसेल तर पोहऱ्यात कसं येणार? वाढत्या वयानुसार हे स्वभावविशेष अधिकच ठळक व्हायला लागले. मुळच्या उपजत स्वभावाला धरून जगावेगळं असं शिक्षणक्षेत्र त्याने निवडलं. सहाजीकच शाळेतील सगळे मित्र आणि तो वेगवेगळ्या वाटेनी आयुष्याचा प्रवास करू लागले. हळू हळू गाठी भेटी कमी होवू लागल्या. तोही नविन वातावरणात आणि मित्रांत रुळला. त्याच्या शाळकरी मित्रांप्रमाणे त्याच्या आई वडिलांनादेखिल त्याच्या जगावेगळ्या आवडीनिवडींबद्दल नवल वाटे. वडिलांचा जरी त्याच्या अप्रचलित क्षेत्रात शिक्षण घेण्यास विरोध होता, पण त्याच्यावर जबरदस्ती करणे त्यांना योग्य वाटले नाही. तो स्वत:देखिल त्याच्या वेगळेपणामुळे त्रस्तं होता. त्याच्या मनात सदैव "जगप्रसिद्ध" विरुद्ध "आपल्याला आवडते ते" असे द्वंद्व चालत असे. कधी "जगप्रसिद्ध" विचार जिंकत तर कधी "स्वाभिमानी" मन.

इतकं असून देखिल स्वत:ला नक्की काय हवं आहे ते त्याला कधी कळलं नाही. इतरांप्रमाणे जगावं, त्याच्यांसारखे छंद जोपासावे, तसल्याच आवडीनिवडी असाव्या असे त्याला सारखे वाटे. बरं तसा तो हुशार होता. अभ्यासातही आणि वागण्या बोलण्यातही. त्याची शालेय शैक्षणिक कारकिर्द बघून तो आयुष्यात अमाप पैसा मिळवणऱ्या क्षेत्रात जाईल असे अनेकांना वाटत असे, त्यालासुद्धा. पण वेगळेपणामुळे पैसा आणि प्रसिद्धी ह्या देखिल त्याच्या द्रुष्टीने अमहत्वाच्या गोष्टी होत्या. स्वत:ची कुशलता तो असल्या "वेगळेपणा" मुळे व्यर्थ घालवतो आहे असे त्याला वारंवार वाटे, पण स्वाभिमानी मन त्याला परावृत्त करत असे. 

वयं वाढत गेले. त्याचे शिक्षण आटोपले. अपेक्षेप्रमाणे चांगल्या पगाराची नौकरी मिळणे अवघड गेले. जी मिळेल ती पत्करून समाधान मानावे लागले. लग्नाचे वारे वाहू लागल्यावर साहाजीकच उपवर मुलींना त्याच्यातील वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव होवू लागली आणि नकार मिळायला लागले. ज्यांना तो आवडला त्यांनी त्याने नकार दिले. त्याचे आयुष्य चांगलेच भरकटले होते. त्याच्या स्वभावामुळे आई वडिल त्रस्त असायचे. त्याने स्वत:ने देखिल बदलायचे अनेक प्रयत्न केले, पण म्हणतात न, स्वभावाला औषध नाही.

अशा रितिने सांगुन यायच्या वयात मुली सांगून आल्या आणि हळू हळू तेही बंद झालं. इतक्या वर्षांच्या मानसिक आत्मसंघर्षानंतर तोदेखिल विटला होता. त्याचे नवे जुने मित्र अद्यापी संसाराला लागले होते त्यामुळे क्वचितप्रसंगीच ह्याच्यासाठी त्यांच्याजवळ वेळ असे. त्याला स्वत:लादेखिल इतर जोडप्यंमाध्ये संकोचल्यासारखं वाटे. अशारितीने आयुष्यात कुठलीही उजवी बाजू दिसत नव्हती. पण काही झाले तरी देवाला साकडं घालायचं नाही हे त्यानी मनाशी पक्कं ठरवलं होतं. कारण तो "नास्तिक" होता.

पण शेवटी त्याच्या आयुष्याचा अरुणोदय़ झालाच. अनपेक्षेने "ती" त्याला भेटली. त्याच्या कचेरीत नव्याने रुजु झालेली. स्वभावाने त्याच्यासारखीच. वेगळी, एकटी, भरकटलेली आणि उदास. साहाजीकच ओळख पुढे नेण्यास कुणी धजावत नव्ह्तं. पण ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची संधी होती. कोणालातरी शब्दांचा बांध फोडणं आवश्यक होतं. त्याचा विश्वास असो का नसो, पण म्हणतात न, जगात देव आहे. एक प्रसंग असा घडला की त्याने आणि तिने आयुष्यात असे काही घडेल असा स्वप्नांत देखिल विचार केला नव्हता. ६ महिन्यांपूर्वी कामानिमित्त जवळच्या फ़ूड मॉलमध्ये एकत्र "लंच" करताना गंमत म्हणून त्या दोघांनी एका प्रतियोगीतेचा फॉर्म भरला होता आणि त्या दोघांना परदेशवारीची दोन तिकिटे मिळाली होती! सुरवातीला त्यांचा आपल्या (करंट्या) नशिबावर विश्वासच बसेना. दुसरी धास्ती म्हणजे तिचे आई वडिल तिला त्याच्या बरोबर एकटे पाठवतील का? पण तिचा मोठा भाऊ त्याच देशात वास्तव्याला असल्यामुळे ती धास्ती राहिली नाही. आणि त्याची तिच्या घरात चांगली प्रतिमा असल्याने तिचे आई वडिलदेखिल तयार झाले.

यथावकाश जाण्याचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गमनाचा दिवस उजाडला. आयुष्यात प्रथमवेळाच परदेशी जात असल्याने दोघांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. विमानाच्या लांबलचक आणि कंटाळवाण्या प्रवासात कधी नव्हे तो एकांत त्याना मिळाला. आसपासच्या आसनांवर सर्व परदेशी प्रवासी असल्याने सहसा बोलताना वाटणारा संकोच आज त्या दोघाना वाटत नव्हता. आपण काय बोलतो आहे हे कुणाला कळणार नाही ह्याची काळजी नसल्याने काही वेळातच त्यांच्यातील सामाजिक भिती अर्थात "सोशल अ‍ॅन्झाईटी" दूर झाली आणि ती दोघे बांध फोडून बोलू लागली. इतकी की केवळ त्यांच्या अमर्यादीत बोलण्याच्या आवाजाचा सहप्रवास्यांना त्रास व्हायला लागला आणि त्यांनी काही काळापुरते नमते घेतले.


विमान परदेशभुमीवर उतरलं आणि ती दोघे सर्व सरकारी सोपस्कार पार पाडून तिच्या भावाला भेटले. त्याच्या गाडीतून शहराकडे जाताना चोहूबाजूला असलेल्या गगनचुंबी काचेच्या इमरती, सुरेख व स्वच्छ रस्ते आणि तिच्या भावाचा अखंड सुरु असलेल त्या शहराबद्दलच्या माहितीचा रेडीओ, ह्यापैकी कशावरही त्या दोघांचे लक्ष नव्हते. ना त्यांना प्रवासाच्या सुरुवातीला असलेलं त्या देशाचं अप्रूप राहिलं होतं. ती दोघेही त्यांच्या विमानातील संभाषणाचा विचार करत होती. अनावधाने एकमेकांना झालेले एकमेकांचे स्पर्श, ती जवळीक आणि झोपेत नकळत तीने त्याच्या खांद्यावर टाकलेली मान, हे त्याला सारखे सुखावत होते. तशी तो दोघही अद्याप तरूणच होती. उमेदीचा बराचसा काळ उलटून गेला असला तरी झाडाला पालवी टिकून होती.


(क्रमश:)

Sunday, April 18, 2010

सल्ला

असं म्हणतात की आयुष्यात फुकट मिळणारी एकमेव वस्तू म्हणजे "सल्ला". आता वकिलांचा अपवाद सोडला तर ही गोष्टं तशी सत्यच म्हणायला हवी. वकिलांशी माझा (सुदैवाने) कधीही संबंध न आल्याने कमीतकमी मला तरी ही फुकटी वस्तू हिमालयात बर्फ़ मिळावा तेवढ्या विपूलतेने मिळाली.

तशी सल्ल्याची सुरुवात ही बहुदा घरातील वडिलधाऱ्यांपासून होते. अनेकदा वडिलधारी मंडळी या सल्ल्यांना "मार्गदर्शन" असे गोंडस नाव देतात. अर्थात काहीप्रमाणात ते मार्गदर्शन जरी असलं तरी वडिलधारी मंडळी बरेचदा आपला उपजत "सल्लेगिरी" चा मोहं अश्या रितीने भागवत असते. मला वाटतं की माणसाच्या अनेक गरजांपैकी दुसऱ्याला सल्ला देणे, ही देखील एक गरज असावी. कारण बरेचदा आपला सल्ला प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही हे ठाऊक असून देखील, फक्त तो ऐकला गेला तरी लोक समधानी होतात. आपलं ह्या जगात काही महत्व आहे हे समाधान, बहुदा हे त्यामागचे कारण असावे.

माझा सल्ला घेण्यास तसा विशेष आक्षेप नाही. पण ज्या लोकांचा एखाद्या ठराविक परिस्थितीशी कुठलाही संबंध नसतो आणि ज्याना कुठलाही अनुभव नसतो अश्यावेळी त्या सल्ला देण्याऱ्यांचं मला फार हसू येतं. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार होता. त्या बिचाऱ्यावर तर सल्ल्यांचा इतका मारा झाला. म्हणजे परदेशात कसं वागावं, काय सोबत न्यावं इथपासून तर किती परदेशी चलन सोबत नेता येतं आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आवडी निवडी कोणत्या इथपर्यंत सगळ्या सांभावीक आणि असांभावीक घटनांवर सल्लेबाजी झाली. यातील गमतीची बाजू म्हणजे "सल्लेगार समिती" मधील एकही प्रतिनिधी कधी देशाबाहेर गेला नव्हता!

अनेकजण फ़ुकट सल्ल्याला "मदत" असही म्हणतात. अनेकदा सद्यपरिस्थीतीबद्दल स्वत:चं मत ठोकताना असले मदतनीस "माझ्या एका मित्रासोबत अगदी असचं घडलं होतं." हे वाक्यं लावून एखाद्या मिळत्या जुळत्या काल्पनीक परिस्थीतीचा आधार घेऊन सल्ला देतात. (ह्यांचे मित्रदेखील किती असतात हो? मला एकदा त्या प्रत्येक "मित्राला" प्रत्यक्ष भेटायचं आहे). बरं मित्राचा संदर्भ वापरण्याचे फायदे तीन. पहिला म्हणजे सल्ला देताना अनुरूप परिस्तिथीचा आपल्याला अनुभव आहे हे सिद्धं करणे. दुसरा म्हणजे काल्पनिक मित्राचा संपूर्ण "बायो डेटा" काढण्यात कुणाला फारसा रस नसल्याने "त्या" मित्राच "रेफ़रन्स चेक" कुणी करत नाही. तिसरी आणि सर्वात मुख्य म्हणजे दिलेला सल्ला चुकीचा ठरला तर तो सल्ला आपल्या "मित्राच्या" परिस्तिथीला उद्देशून दिला असल्याने सल्ल्याची जबाबदारी पूर्णपणे टाळणे. त्याचवेळी, जर सल्ला (चुकुन) उपयोगी पडला पाठ थोपटवून घेणे.


दुर्दैवानी, सल्लेगार समितीपासून स्वत:ला वाचवण्याचा तसा कुठलाही शास्त्रीयं तोडगा अद्याप उपलब्ध नाही. आणि नजिकच्या भविष्यात तसलं काही होण्याची चिन्हेदेखिल दिसत नाहीत. त्यामुळे अनावश्यक सल्ला "ऐकावे जनाचे करावे मनाचे" हे लक्षात ठेऊन एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावा, हा एकच सल्ला मी सर्वांना देऊ इच्छितो!

Sunday, March 28, 2010

बावळटपणा

बावळटपणा आणि त्यातल्या त्यात बावळट व्यक्ति हा माझ्याद्रुष्टीने फ़ार गहन अभ्यासाचा विषय आहे. (मी बावळट आहे असे मानणारे माझे अनेक हितशत्रू आहेत. पण बोलून चालून ते माझे हितशत्रू असल्याने मी त्यांचे माझ्याबद्दलचे विचार जास्त मनाला लावून घेत नाही ;-))

असो, तर मे ह्या जातीचा (इंग्रजीतील "स्पेसिस" हो....नाहीतर तुम्हाला भलतच काही वाटेल) फ़ार सखोल अभ्यास केला आहे. हा लेख माझ्या आकलनावर आणि निष्कर्षावर आधारित आहे.

बावळट व्यक्ति ह्या देवाप्रमाणेच सर्वत्र आढळतात. काही ठिकाणी देवाच्या वास्तव्यालादेखिल मज्जाव असेल पणं बावळट व्यक्तिंना नाही. बावळट व्यक्ति हि सहसा उच्च पदावर आढळते. आणि (माझ्यप्रमाणे) अनेक सुज्ञ व्यक्तिना असल्या लोकाना "साहेब" किंवा "सर" किंवा "बॉस" म्हणण्याची पाळी येते. बावळट व्यक्तिचं सर्वात लक्षं वेधून घेणारं "कॅरॅक्टरिस्टिक" (शाळा सोडून बरीच वर्ष झालीत... नेमके शब्दं आठवत नाहीत हो :-() म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलणे आणि आपले पितळ उघडे पडले आणि अपेक्षित यश नाही मिळाले की त्याचे खापर आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांवर (?) फोडणे. थोडक्यात म्हणजे, "कुणाच्या खांद्यावरं कुणाचे ओझे" ह्या पंक्तिला शोभेसी एखाद्या दुबळ्या कनिष्ट कर्मचाऱ्याची अवस्था आढळल्यास आसपास "त्या" व्यक्तिचा "संचार" आहे हे ओळखावे.

बावळट व्यक्ति ह्या बरेचदा "सहकर्मचारी", "सहपाठी" (हे मुख्य:त्वेकरून महाविद्यालयात आढळतात आणि "ग्रूप प्रोजेक्ट" च्या वेळी आपले खरे रूप दाखवतात. त्यावेळी आपण ते बावळट आहे म्हणून सगळं प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि त्याना बावळट म्हणतो) असल्या "पोटजातीत" आढळतात. महिलावर्गाच्या द्रुष्टी ने समस्त पुरुषवर्ग मुख्यत: नवरा आणि प्रियकर हा "बावळट" ह्या प्रकारात मोडतो. वर वर आपल्या नवऱ्याची (दुसऱ्या) महिलांसमोर कितिही प्रशंसा करत असल्या तरी मनातून "आमचं सोंग बावळट आहे. मी आहे म्हणून सांभाळून घेतलं, दुसरी कुणी असती तर ६ महिनेदेखिल नसती टिकली ह्या घरात" हे बोधवाक्य मनाशी पक्कं असतं. अर्थात असल्या बावळटपणाचे "फायदे" हे पुरुषवर्गाला ठाऊक असल्याने तेही "येडा बनके पेडा खानेमे" खुश असतात ही त्यातली गोपनीय बाजू.

परन्तु हाताखालची आणि क्वचितप्रसंगी हाताशेजारची (म्हणजे मित्रं, रूम मेट्स ई. ई.) व्यक्ति जर बावळट असेल आणि कोणतीहि आपल्याला "गोत्यात" आणू शकणाऱ्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर नसेल तर मग आपली चैनच चैन! कधितरी आपल्यातील "स्मार्टपणा" मिरवण्याची हुक्की आली की असले लोक फार कामात येतात. माझं हे वाक्य जर तुमच्या पांढरपेशी मनाला तडा देत गेलं असेल तरं क्षमस्व: (ह्या प्रसंगी सर्वप्रथम नमूद केलेल्या बावळट व्यक्तिला स्मरावे आणि "इट्स ऑल अबाऊट बॅलंसिंग" असं म्हणून समाधान मानावे)

तश्या अजून अनेक पोटजाती आहेत. उदर्ह्र्णार्थ लांबच्या प्रवासातील सहप्रवासी, कपडे बिघडवणारे शिंपी, फाडणारे धोबी, पाण्यात दूध टाकून विकाणारे दूधवाले, नियमीत उशीरा येणारे बस चालक इथपासून तर खोटी आश्वासनं देणारे राजकीय नेते इथपर्यंतं सगळीकडे बावळट व्यक्तिंचा बाजार आहे. (मुद्दा एवढाच की हि सगळी मंडळी बावळट आहे की हे सगळं माहिती असूनसुद्धा वर्षानूवर्ष त्याच लोकांवर विश्वास ठेवणारे आपण ...:))

बावळटपणाचे तसे अनेक फ़ायदे देखिल आहेत. "मी माझा" फ़ेम चन्द्रशेखर गोखल्यांच्या एका चारोळीप्रमाणे:

                      "इथे वेडॆ असण्याचे
                     बरेच फ़ायदे आहेत
                      शहाण्याना जगण्याकरता
                      काटेकोर कायदे आहेत"


ह्याच धर्तिवर काही सुज्ञ लोक बावळट असण्याच सोंग घेतात. त्यांच्यावरिल सखोल अभ्यासानंतर काही कमालीची भन्नाट निरिक्षणं मला आढळून आली आहेत. एका बावळटपणाचं कातडं घातलेल्या "हुशार" व्यक्तिकडून कळलं की ह्या आवरणामुळॆ आयुष्यात कुठलेही महत्वाचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या आसपासचे म्हणजे कुटुंबात आणि कचेरीत हे सदैव स्वत:च्या आणि ह्यांच्या कामात आणि हे भाग्यवंत मधे तसेच! कोरडॆ! त्यामुळे त्यांना आयुष्याच्या एकूण प्रवासाचा कधीच जास्त त्रास झाला नाही. बरं आजूबाजूचे ह्यांच्यासमोर हुशारपणाची शेखी मिरवत ह्यांचं काम स्वत:हून पूर्ण करायचे आणि हे महाभाग तु हुशार तु हुशार करत आरामात जगले!

वरिल परिच्छेदाची दूसरी बाजू अशी की बावळट व्यक्तीला (किंवा तसे भासवणाऱ्या व्यक्तीला) सहसा कुणी तोंडावर बावळट म्हणत नसल्याने, त्या गोष्टीचा तसा काही फारसा त्रास होत नसतो. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात असले प्रश्नं बावळट लोकाना पडत नसल्याने आणि भासवणाऱ्यांना त्या गोष्टीचा फ़रक पडत नसल्याने सहसा अश्या व्यक्ति "निंदा" या प्रकाराला विशेष घाबरत नसतात.

अश्यावेळी हुशारी बरी की बावळटपणा हे मला अद्यापी न उलगलेलं कोडं आहे.....

Tuesday, March 23, 2010

माझी पहिली पोस्ट!

बऱ्याच दिवसान पासुन ब्लॉग सुरु करण्याची इच्छा होती. आज मुहुर्त लागला! संगणक क्षेत्राशी विशेष संबंध नसल्याने आणि शाळा संपल्यानंतर मराठी लिहिण्याची वेळ न आल्याने ब्लॉग सुरु करताना बरेच गमतीशीर अनुभव आले. त्यात ह्र्स्व-दिर्घाच्या चुका.... (ह्र्स्व टाईप करायलाच मला कमीत कमी १५ मिनिटे लागली हे वेगळं सांगयलाच नको)

इतर मराठी ब्लॉग वाचत असल्यामुळे, ब्लॉग कुठल्या संकेतस्थळावर सुरु करयचा हे जरी ठाऊक होतं, पण कसा सुरु करायचा.....घोडं तिथेच अडकलं होत.
माझ्या आणि कॉलेजात शिकत असलेल्या आजि व माजी विद्यार्थ्यांचा खरा देव असणाऱ्या गुगल डॉट कॉम ची मदत घ्यायचे ठरवले. (हल्ली शाळकरी मुले देखील ह्याच देवाला साकडं घालतात असं ऐकलयं... असेल बुवा... आमचं बालपण एवढं कष्टाचं नव्ह्तं..)

बऱ्याच शोधानंतर "क्विलपॅड" नावच्या एका सॉफ़्टवेअरची माहिती मिळाली. (सॉफ़्टवेअरला मराठीत काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.... क्षमस्व) पण परत ते सॉफ़्ट्वेअर "इन्स्टॉल" (परत क्षमस्व....अन्ज्ञान दूर केल्यास उपकार होतील) करा... मग "रन" करा....हे सगळं कळल्यावर ब्लॉगचा विचार डामाडौल व्हायला लागला... शेवटी महत्प्रयासानी हे "बरहं" नावाचे सॉफ़्ट्वेअर सापडले... आमच्यासारख्या "अशिक्षीत" लोकांकरता कोण्या द्र्ष्ट्या व्यक्तिने विचार केला याचा मनोमन आनंद झाला आणि मी त्या व्यक्तीचे आभार मानून ह्या कार्याला श्रीगणेश केला!

पुढे काय लिहायचे हे काही ठरवले नाही.....काही सुचेल की नाही ह्याची पण कल्पना नाही....आणि मुख्यतः कुणी माझे ब्लॉग्स वाचेल तरी का ह्याची शाश्वती पण नाही....तरी सुद्धा एक उराशी बाळगलेलं स्वप्नं पूर्ण करण्याच्या इच्छेने हे कार्य हाती घेतलं आहे.... बघुया काय होतयं ते....