Thursday, April 13, 2017

परत श्रीगणेश!

नमस्कार मित्रांनो!

तब्बल सात वर्ष्यांच्या प्रदीर्घ अवकाशानंतर परत एकदा लिहिणं सुरु करण्याचा विचार आहे. असं म्हणतात की सात वर्ष टिकलेली मैत्री आयुष्यभर टिकते. या २३ ऑगस्टला मला लिहून सात वर्ष होतील. मैत्रीचा नियम लिखाणाला लागू केला तर महिन्यांनी माझा ब्लॉग expire झाला असता ;-) तसा मधे मधे, म्हणजे वर्षांतून - वेळा मी माझ्याच ब्लॉगला भेट देत होतो. अजूनही अनेक देशातील काही मराठी वाचक मित्र ब्लॉगवर येत असतात. बहुदा काही keywords search त्यांना माझ्या ब्लॉग वर आणत असावेत.

तर मी लिहिणं बंद का केलं? कारण काहीच नाही. काही सुचलं नाही (writer's block! हा हा.. "मी writer" म्हणे), जे सुचलं ते ब्लॉगवर टाकण्यासारखं आहे असं वाटलं नाही, आळशीपणा (हे सगळ्यात मोठं कारण!), सांसारिक जाबदाऱ्या, ई.... अर्थात ही सगळी बहाणेबाजी झाली. ज्याला लिहायचं आहे तो वेळ काढून लिहितोच.

२०१० मध्ये सुरुवातीला जेव्हा ब्लॉग्स वाचायला सुरु केले, तेव्हा मी अक्षरशः झपाटून गेलो होतो. सकाळचा चहा पिताना ब्लॉग्स वाचणे हा त्यावेळी माझा सर्वात आवडता छंद होता. रविवारी तर कमीतकमी तास मी मराठी ब्लॉग्स वाचत असे. वाचताना वाटलं की हे सगळे ब्लॉगर्स तर आपल्यासारखेच वाटतात. लिहितात पण रोजच्या सामान्य घडामोडी. असं असूनही मला ते इतके का आवडतात? याचं कारण मला अजूनही उलगडलं नाहीये. अत्यंत अनियमितपणे का होईना, मी अजूनही काही ब्लॉग्स वाचतो. माझ्या बर्याचश्या आवडत्या ब्लॉगर्सनी लिहिणे बंद केले आहे याचे वाईट वाटते. अर्थात मी का ते समजू शकतो. वाईट वाटण्याचे कारण की हीच ती मंडळी आहेत ज्यांनी मला या मराठी ब्लॉगविश्वात खिळवून ठेवले, नव्हे वेडावून लावले. पु.लंची पुस्तकं आणि न्यूजपेपर वाचण्यापलीकडे जर आणखी काही मराठी वाचण्याची सवय लागली ती ह्या ब्लॉगर्स मुळे. अजूनही मला त्यांची नावे माहित आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याची इच्छा आहे. ते शक्य आहे कि नाही माहित नाही. कमीत कमी त्यांनी पुन्हा लिखाण सुरु करावं असं नक्की वाटतं. माझ्या चाहत्या ब्लॉगर्स ची नाव टाकण्याचा मोह अनावर होतोय पण त्यांना ते आवडेल कि नाही हे माहित नसल्याने तो मोह आवरतो.

तसं या सात वर्षात माझ्या आयुष्यात बराच बदल झाला. चांगला आणि वाईट. अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. काही महत्वाच्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्याने मन खट्टुही झालं. पण हे सगळं चालायचंच.

तसं ब्लॉग परत सुरु करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फावला वेळ. सध्या माझ्या ऑफिसमध्ये काही बदल होत आहेत, department wise. ते बदल लागू होईपर्यंत अक्षरशः फक्त ऑफिसात "हजेरी लावणे" एवढेच काम आहे. तरी बरं कॉम्पुटर आणि इंटरनेट access आहे. त्याचवेळी मी परत, विरंगुळा म्हणून, ब्लॉग्स वाचायला सुरु केले आणि हा हा म्हणता परत त्या सोनेरी दिवसात पोहोचलो. स्वतःचा ब्लॉग बंद केल्याची हळहळ झाली आणि महत्प्रयासानी परत लिहिण्याचं धाडस केलं. आता हे किती दिवस चालेल कोण जाणे. काम परत सुरु झाल्यावर "जैसे थे" परिस्थिती ओढवली नाही म्हणजे मिळवली.


बघू..कुठपर्यंत उत्साह टाकतोय!

No comments:

Post a Comment