Showing posts with label खादाडी. Show all posts
Showing posts with label खादाडी. Show all posts

Tuesday, April 18, 2017

बेल्हे: पालावरचं चिकन!

तब्बल सात वर्षांपूर्वी "मनमौजी" या ब्लॉगरने "बेल्ह्याचं चिकन" ही चमचमीत पोस्ट टाकली होती. त्याचवेळी नक्की केलं होतं कि आयुष्यात एकदा तरी बेल्ह्याला जाऊन पालावरचं चिकन खायचंच. बेल्हे गाव जरी दुर्गम नसलं तरी आडवळणाला नक्कीच असल्याने जाण्याचा योग येत नव्हता. तरीही बेल्ह्याला जाण्याची तीव्र ईच्छा मधून मधून डोकं वर काढत असे. शेवटी महत्प्रयासाने, थोडं planning करून आणि काही जातीचे खवय्ये हाताशी घेऊन गढ सर केलाच! "मनमौजी"ची पोस्ट आणि संदीप परडकर नावाच्या ब्लॉगरने "फुलोरा सामना" मधील पुनःप्रकाशित केलेला एक लेख वगळता ह्याचा कुठेही उल्लेख नाही. कमीत कमी मला तरी इंटरनेटवर काही सापडलं नाही. ह्याच कारणामुळे जास्तीत जास्त चिकन प्रेमींपर्यंत हि माहिती पोहोचावी म्हणून "मनमौजी"चं आभार मानून हि पोस्ट टाकतो आहे. 

बेल्हे गाव हे पुण्यापासून जवळपास १०० किमी दूर आहे. बेल्ह्याला आळेफाटा मार्गे गाडीने २-२:३० तासांत सहज पोहोचता येते. रस्तेदेखील बहुतांशी चांगले आहेत. बेल्हे गावात दर सोमवारी बैलबाजार भरतो. अनेक शेतकरी रविवारीच बेल्ह्याला मुक्कामाला येत असल्याने त्यांच्या जेवणाची सोय म्हणून ह्या खानावळी सुरु झाल्या. ह्या खानावळी फक्त रविवारीच उघड्या असतात त्यामुळे तुम्ही बेल्ह्याला खास चिकन खाण्यासाठी जाणार असल्यास ह्याची नोंद घ्यावी. लागून ३-४ खानावळी आहेत आणि त्या सगळ्या बैलबाजाराच्या अंगणातच आहेत. 

"फुलोरा सामना" मध्यल्या लेखात "अशोक हिंद खानावळ" चा उल्लेख असल्याने आम्ही तिथेच जायचं ठरवलं. तशीही जास्त गर्दी ह्याच खानावळीत होती. खानावळीसमोर गाडी उभी करून आम्ही मालक "बबनराव बांगर" यांची भेट घेतली. बबनरावांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले व आम्हाला बसायला सांगितले. इथे टेबल खुर्चीची सोय नाहीये आणि शेणानी सारवलेल्या जमिनीवर भारतीय बैठक घालून बसावे लागते. 

बेल्हे चिकन
अतिशय साधी असूनही खानावळ कमालीची स्वच्छ आहे

 मेन्यूमध्ये चिकन, भाकरी, सूप, शाकाहारी मासवाडी आणि मटकी एवढ्याच डिशेस आहेत. अर्थात मी बेल्ह्याला जाऊन शाकाहारी खाण्याच्या फंदात न पडल्याने त्या डिशेसचे फोटो नाहीयेत. प्रत्येक डिश अप्रतिम, अगदी भाकरी सुद्धा! अति तिखट किंवा अति तेलकट नाही आणि खाताना स्वछता जाणवते. ४ जण मनसोक्त खाऊन बिल फक्त रु. १,०००. 

बेल्हे चिकन
 चुलीवर शिजवलेलं चिकन (सुखं), चिकन सूप (अनलिमिटेड) आणि भाकरी

बेल्हे चिकन
रस्सा (उकडलेलं अंडं घालून)

काही गावकरी देखील खानावळीत जेवायला आले होते. ते भाकरीचे बारीक तुकडे करून रस्स्यात कालवून खात होते आणि सुखं चिकन तोंडी लावत होते. हि स्थानिक लोकांची खाण्याची पद्धत आहे असं बबनरावांनी आम्हाला सांगितलं. जेवणाचा मनसोक्त आनंद घेऊन आणि परत एकदा भेट देण्याचा संकल्प करून आम्ही पुण्याला परतलो. 

जर तुम्हीदेखील प्रथमच बेल्ह्याला चिकन खाण्यासाठी जाणार असाल तर मदत म्हणून थोडी माहिती खाली देतो आहे:

१. या खानावळींना स्थानिक "पालं" म्हणतात
२. खानावळीचा पत्ता: बेल्हे बैलबाजार पटांगण (Google Maps Coordinates: 19.1180369294, 74.1790050548)
३.  रविवारी महाशिवरात्र असल्यास किंवा कोणताही मोठा सण असल्यास पालं बंद असतात. (जाण्यापूर्वी फोन करून गेल्यास उत्तम)

बेल्हे चिकन


जर तुम्ही माझ्यासारखे हाडाचे चिकनप्रेमी असाल तर बेल्ह्याला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव मला कळवा!