Tuesday, June 22, 2010

मोडेन, पण...

तो.. वक्तशीर, नोकरीत रुजू झाल्यापासून २३ वर्षांत एकदाही उशीरा ऑफ़िसमध्ये गेला नाही. एकही सिक लिव्ह घेतली नाही. एक दिवस, काही अनियंत्रित कारणामुळे १५ मिनिटे उशिरा आला. चुक त्याची नव्हती. उशिर झाला होता हे मात्र खरं. साहेबांनी "लेट-मार्क" लावलं. त्याच्याकडून निषेध झाला. साहेबांनी ऐकलं नाही. २३ वर्षांचा हवाला देऊनही उपयोग झाला नाही. तो आमरण उपोषणावर गेला. बायको, मुलं, मित्र, सहकर्मचारी यांनी समजावून पाहिले. त्याने ऐकले नाही. ३० व्या दिवशी अशक्त होवून त्याने प्राण सोडले. कंपनीने प्रकरण विनाकारण ताणून धरल्यामुळे साहेबांना बर्खास्त केले.


त्या दोन कुटुंबांत पारंपारिक वैमनष्यं. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं. नविन पिढी आधुनिक. त्यातील एका कुटुंबातील मुलगा शिकायला परदेशी गेला. या वैमनष्याचा त्याला तिटकारा. मायदेशी परतल्यावर शत्रूपक्षाच्या समवयस्क मुलाला नदीन पडून मरता मरता वाचवले. दोन्ही कुटुंबांना ही बातमी कळली. ज्याला वाचवण्यात आले त्या मुलाचा त्याच्याच वडिलांनी खून केला. आपला मुलगा मरता मरता वाचला या आनंदापेक्षा, तो "त्या" कुटुंबाच्या एका सदस्याने उपकार केले म्हणून वाचला, ही वस्तूस्थिती जास्त सलणारी होती.


स्वातंत्र्यपुर्व भारतातील एका राजेशाही घराण्यातला त्याचा जन्म. देश संघटीत झाल्यानंतर होतं नव्ह्तं ते सगळं नेलं. सोन्याच्या झारीतून दुध प्यायलेला तो, आज दुध विकत घेण्याची ऐपत नव्हती. त्यांच्याच महालातील एक पारंपारिक नौकरांचं कुटुंब. स्वातंत्र्यानंतर नशिब बदललं. लहानश्या कापडाच्या दुकानाचं मोठ्या उद्योगात रुपांतर झालं. जुन्या ‌ऋणानुबंधामुळे त्या कुटुंबाने त्याला एका उच्च पदावर नोकरी बहाल केली. पण त्याने उर्वरित आयुष्य गल्लो-गल्ली भिक मागत काढलं.


परिवारातील सर्व पुरुष सदस्यांनी सशस्त्र सेनेत भरती व्हावं हा अट्टाहस. त्याचं मन संगीतात रमलेलं. लहानपणापासून मिळालेले बाळकडू, साम-दाम-दंड-भेद हे सुद्धा त्याला रोखू शकले नाहीत. प्रौढ झाल्यावर त्याने सहन न होवून घर सोडलं. वडिलांनी संबंध तोडले. काही वर्षांतच तो एक नावाजलेला संगीतकार झाला. परदेशी एका कार्यक्रमासाठी जात असताना विमान अपघातात अनेकांबरोबर प्राणांस मुकला. सरकारने अनेक वर्षांनी मरणोत्तर "पद्मश्री" जाहीर केला. त्याच्यावतिने पुरस्कार एका मित्राने स्विकारला.

4 comments:

  1. भाई,
    सहीच रे...काही घटना खर्‍या आहेत की सगळ्याच काल्पनिक!

    ReplyDelete
  2. अभिलाष, चटका लावून गेल्या रे घटना. विशेषत: दुसरी घटना अति भीषण व सुन्न करणारी आहे. ती काल्पनिकच असेल हे म्हणू शकत नाही याचे दु:ख व आजही समाजात असे घडते आहे ही सत्यता पचत नाहीये. :(

    ReplyDelete
  3. आभार विद्याधर आणि भानस! सुदैवानी सर्व घटना काल्पनिकच आहेत. दुर्दैवानी योगायोग असण्याची शक्यता फ़ारच जास्त आहे.

    ReplyDelete
  4. अभिलाष, भारी लिहलयस रे एकदम शिर्षक पण योग्यच...

    ReplyDelete