Monday, May 10, 2010

काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं


परत एकदा पक पक पकाक बघत होतो. त्यात मधेच एक दु:खी पण अप्रतिम अशी ओळ आहे... "काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं, फ़िरून उकरावं, कशापायी?" माझ्या या पोस्टचा आणि चित्रपटातील प्रसंगाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मग संदर्भ सोडून हे वाक्य मी का निवडलं? तर काळाच्या मुठीतून जे निसटून गेलं आहे ते परत उकरुन काढण्यासाठी!

आजच्या माहिती तंत्रद्यानाच्या जगात बऱ्याचश्या मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा उकरुन काढता येतात. उदाहर्णार्थ जुन्या जाहिराती. मध्यंतरी "युट्युब" वर वेळ घालवताना अर्थात टि.पी. करताना काय काय सापडलं म्हणून सांगू! गोंडस पारशी मुलाची "जलेबी" वाली धारा तेलाची जाहिरात... अजन्ता घडाळ्याच्या ठोक्याना ताल देणारी आजी.. एशियन पेंटसची जवान सिमेवरून परत येतो आणि आरती घेताना आपल्या मुलाच्या हातावरून हात फ़िरवतो... फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीतर विचारायलाच नको! पारले जी ची "हमको पता है जी" वाले आजोबा आणि नातवंडं....इथपासून तर बुलंद भारत की बुलंद तस्वीर.....हमारा बजाज पर्यंत... खोटं वाटेल... पण अक्षरशह: डोळ्यातून पाणी आलं... का ते कळलं नाही. काळच्या ओघात वाहुन गेलेलं निरागस बालपण आठवल्यामुळे असेल कदाचीत....

तर हिप्नोटाईज्ड झाल्यासारखा मी एकामागून एक व्हिडीयोज बघायला लागलो. "एक चिडीया" आणि "मिले सुर मेरा तुम्हारा" बघुन तर लहान मुले कार्टुन बघताना करतात तसा माझा चेहरा झाला होता:) "पूरबसे सुर्य उगा" वाली साक्षरता मिशनची जाहीरात बघून खरच सरकारी माध्यमांचं कौतुक करावसं वाटलं. त्याकाळी मोजकी साधनं असुनही जनजागृतीची ही अप्रतीम जाहिरात त्यानी बनवली होती.

ही पोस्ट केवळ जुन्या जाहिरातींबद्दल नाही. काही जीव्हाळाच्या गोष्टी; ज्यांचा कालांतराने त्या कालबाह्य झाल्याने विसर पडला, त्या उकरुन काढण्यासाठी ही पोस्ट. त्यापैकी काहींची यादी खालील प्रमाणे....

लहान मुलांसाठी असलेलं एकमेव मराठी कॉमिक्स...... "चांदोबा"

डस्टर-पिंजर-खार-कबुतर-ढोली असला "रॉक-पेपर-सिझर" चालीवरचा मराठी खेळ (मी कबुतरला खब्बुतर म्हणत असे कारण खार म्हंटल्यावर कबुतर पेक्षा खब्बुतर म्हणणं सोपं पडे :))

मुलींकरता असलेला खेळ.....भुलाबाई (मी लहान असताना माझ्या बहिणीबरोबर जात असे. भुलाबाईचे गाणे थोडे थोडे अजुनही आठवतात. त्यात अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता.... भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असल्या चालीवर एक यमक जुळणारं गाणं होतं, ते माझं "फ़ेव्हरेट"!)

कंचे (कंचे म्हणजे खेळण्यातले काचेचे मार्बल्स) आणि कंच्यासारख्याच पण पांढऱ्या, दगडी आणि मोठ्या असलेल्या पखांड्या.

अंधळी कोशींबीर... (हि बहुदा अजुनही खेळली जाते)

डोंगराला आग लागली पळा पळा नावाचा एक मैदानी खेळ होता.... तो कसा खेळतात ते आता आठवत नाही :(


आमलेट की चॉकलेट हा ७ चौकट आखुन खेळाला जायचा. त्याची रचना
 खालीलप्रमाणे होती.



क्रमाक्रमाने एक एक रकान्यान दगड टाकत जायचा आणि ज्या रकान्यानत दगड असेल त्या रकान्याशिवाय उरलेल्या रकान्यात लंगडी घालत जायचं आणि परत यायचं. दगड ठरलेल्या रकान्याच्या बाहेर गेला किंवा दोन्ही पाय जमिनीला टेकले की खेळाडू बाद!

उन्हाळ्यात पाहुणे घरी आले कि दुपारी ठरलेला खेळ..... व्यापार आणि पट (होय...तोच शकुनी मामावाला). शिवाय सत्ते लावणी, पाच-तिन-दोन, रमी हे ही होतेच.

पावसाळ्यात मामाच्या गावी एक "खुपसणी" नावाचा खेळ असायचा. लोखंडाची सळाख दुर फ़ेकायची. ओल्या जमिनीमुळे ती आत खुपसायची म्हणून खुपसणी!

युनिसेक्स खेळ.... लगोरी.

सर्वात लोकप्रिय हिंदी कॉमिक्स.... चाचा चौधरी (चाचा चौधरी का दिमाग कॉम्प्युटरसेभी तेज चलता है! :))

दुरदर्शन वरिल गाजलेल्या मालिका..... चंद्रकांता, स्कूल डेज, सॅम और गोपी वाली तहकीकात, पंकज कपूर ची फ़टीचर आणि करमचंद जासुस, अलिफ़ लैला, अफ़साने, इ. इ.

सध्या इतकाच.... तुम्हाला आठवलं असं काही तर मलाही कळवा!

8 comments:

  1. "आई शिका ना अ, आ, ई" ही जाहिरात पण मस्त होती. ही सगळी आठवण झाल्यामुळे मस्त वाटलं.

    ReplyDelete
  2. भन्नाट !! ..

    लगोरीची युनिसेक्स व्याख्या आवडली :) .. खरंच रे डोंगराला आग लागली कसं खेळतात मी पण विसरलो आता.

    आमच्या लिस्ट मध्ये अजूनही काही खेळ होते. विषामृत, सोन-जोड साखळी वगैरे.. आणि पत्ते तर आम्ही तासनतास कुटत बसायचो. canestra, judgement, challenge, तीनशे चार, लॅडीस.. एक संपला की दुसरा चालू :)

    ReplyDelete
  3. सकाळी सकाळी मंजूळ आवाजात वाजणारे "वंदे मातरम्" आणि मग हळू हळू उमटणारा तो DD चा symbol..सारं सारं कसं मंत्रमुग्ध होवून बघता असायचो. काही दिवसांपूर्वीच चर्चा झालेली ह्यावर.

    मला वाटते आपल्या पिढीच्या लोकांचा तो सुवर्णकाळ म्हटला तरी हरकत नाही. हल्ली कुठं ती मजा?

    अभिलाष... तुस्सी छा गये!

    ReplyDelete
  4. डोंगराला आग लागली पळा पळा पळा या खेळात दोनजण हात वर करून एकमेकात गुंफतात. निर्माण झालेल्या बोगद्यातून इतर खेळाडूनी जायचे असते. त्यावेळी हात गुंफणारे दोघेजण डोंगराला आग लागली पळा पळा पळा असे मोठ्याने म्हणत असतात. या ऒळीची एक वा अधिक आवर्तने झाल्यावर दोघानीही हात गुंफलेल्या स्थितीततच खाली आणून जाणार्यापॆकी एका खेळाडूला हातांच्या कड्यात अडकवून बाद केले जाते. बाद झालेला खेळाडू मग हात गुंफणार्यातील एकाची जागा घेतो. आवर्तनांची संख्या बोगदा बनविणार्यांच्या मर्जीवर ठरते.

    ReplyDelete
  5. विद्याधर... हो रे.. आज दिवसभर आई शिका ना अ आ इ हेच गुणगुणत होतो! पुर्ण आठवत नाही. गूगलवर पण काही सापडलं नाही :( प्रतिक्रियेबद्दल आभार!

    धन्यवाद हेरंब! विषामृत राहिलं टाकायचं... खरतर विसरलो होतो :-) प्रतिक्रियेबद्दल आभार!

    नेहा, करेक्ट! त्यावेळी कृष्णधवल चित्रसंच [ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट टि.व्ही. :-)] होते आणि फ़क्त तेच दिसायचं. तेव्हाचं ठाऊक नाही, पण आता ते आठवून मजा येते. अजुन एक आठवण जागृत केल्याबद्दल धन्यवाद. प्रतिक्रियेबद्दल आभार!

    शरयु ब्लॉगवर स्वागत आणि खेळाबद्दल माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. वाचल्यावर मलापण आठवला खेळ. प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete
  6. i guess u shld put tht visitor's counter on ur blog as well so that you know how many have visited ur blog in total.

    neha

    ReplyDelete
  7. रुमालपाणी व काचापाणी हे दोन खेळ सतत खेळायचो आम्ही. आणि दोरीच्या उडयाही. अगदी पैजा लावून.:D पत्ते, कॅरम, सागरगोटेंचा तर धुडगुस. अभिलाष, मस्त वाटले रे पोस्ट वाचून. तो खुपसणी खेळ नवीनच कळला.

    ReplyDelete
  8. आभार भानस! ब्लॉगवर स्वागत. वास्तविक माझं ब्लॉगींग तुमचा ब्लॉग वाचूनच सुरु झालं. त्यामुळी तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. धन्यवाद!

    ReplyDelete