Monday, August 23, 2010

मोठेपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा... ह्या सुभाषीतावर दुमत व्हायचं कारण नाही. मोठी माणसे (वयानी) नेहमी बालपणाचं कौतुक करताना दिसतात. मी देखिल त्याला अपवाद नाही. लहानपणी काय कसलाच ताण नाही. दररोज ऑफ़िसला जाणं, घरासाठी खरेदी करणं, बिलं भरणं, कर्जांचे हप्ते, मुलांच्या शाळा, त्यांचं संगोपन, आयकर भरणं, इतर जबाबदाऱ्या कसलही टेन्शन नाही. आरामात आयुष्य जगण्याचा खरा आनंद केवळ बालपणात लुटता येतो.

प्रौढावस्थेतून बालपणात परतण्याचं एखादं यंत्र असतं तर काय मजा आली असती नाही? पण प्रामाणिकपणे विचार केल्यास किती प्रौढांना परत बालपणात जावसं वाटेल? प्रौढांवर अनेक जबाबदाऱ्या असतात हे मान्य. पण वयानुसार येणारा अनुभव आणि आदर लहान मुलांना खरच मिळतो का? एखादं कटकट करणारं कार्ट आपण हिडिस फ़िडिस करुन हाकलून लावू शकतो, लहान वयात मुलांना विशेष आदर देण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण आपण लहान असताना कुणी आपल्याशी असं वागतं तेव्हा खरच आपल्याला आवडतं का? बरं तुच्छतेने वागणारा आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्याची चुक असून देखिल वयोमानानुसार उलट उत्तर देता येत नाही. पण एखाद्या प्रौढाशी आपण तसं सहसा वागू शकतो का? अनेक कर्तुत्व करण्याचं कौशल्यं आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचं सामर्थ्य हे प्रौढावस्थेतच येतं.

लहानपणी रोजची शाळा, अभ्यास, आई वडिलांचा धाक, अनेक गोष्टी करण्याची इच्छा असून न करता येणं आणि आजच्या वातावरणातला ताण यासारख्या जबाबदाऱ्या, न कळता का होईना, असतातच. शाळेत अव्वल येण्यासाठी, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लहानपणी देखिल असह्य ताणं झेलावा लागतो. प्रौढांप्रमाणे हवी ती वस्तू विकत घेणे, वाटेल तेवढा वेळ टि.व्ही. बघणे, कुठल्याही वयोगटाशी कुठल्याही विषयावर चर्चा करणे या सारख्या मोठीपणी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी लहानपणी सहसा वर्ज्य असतात. थोडक्यात म्हणजे लहानपण हे स्वातंत्र्याला पारखं असतं. स्वातंत्र्य असायला हवं की नाही हा इथे मुद्दा नाही. पण साधारणत: ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांची सहसा अशीच कुचंबणा असते. ५-६व्या वर्षानंतर मुलांना थोडं थोडं कळायला लागतं. पण त्याचवेळी ते "क्युट" या फेसमधुन बाहेर पडू लागत असल्याने त्यांचं कोडकौतुक कमी व्ह्यायला लागतं आणि त्यांच्यावर दमदाटी, त्यांना लहानसहान कामं सांगणं इत्यादी सुरु होतं. "लहान आहेस तो पर्यंत मजा करून घे, पुढचं आयुष्य म्हणजे रौरव नरक", असंही त्यांना ऐकवलं जातं, पण हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसणं, या एकमेव पण अत्यावश्यक बंदीमुळे त्याला विषेश अर्थ राहत नाही.

पालक चुकीचं वागतात असं मला सुचीत करायचं नाहीये. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतो की लहानपणी मजा असते, मोठेपणी सगळं नाहीसं होतं, हे मला तरी मान्य नाही. मी लहान असताना इतरांप्रमाणे रात्री कितीवेळ बाहेर राहाणे, किती आणि कोणते सिनेमे बघणे, महिन्यात कितीवेळा हॉटेलात मित्रांबरोबर खाणे, किती वेळ टि.व्ही. बघणे इ. ला मर्यादा होत्या. अर्थात त्या आवश्यक होत्या. आता मी विवाहीत आहे. मला ६ महिन्यांची मुलगी आहे, त्यामुळे अर्थातच जबाबदाऱ्या आणि ताण आहेत, पण निर्बंध नाहीत. अर्थात मी अव्याभिचारी अनिर्बंधांबद्दल बोलत नाहिये. पण मी कधीतरी उशीरापर्यंत टि.व्ही. बघितला किंवा  उगिचच एखादी वस्तू विकत घेतली, तर मला कुणी दमदाटी करणार नाही किंवा जाब विचारणार नाही. ही स्वातंत्र्याची भावना आपण किती सहजतेने दुर्लक्षीतो? बहुदा या भावेनेसाठीच लहान मुलांना लवकरात लवकर मोठे व्हावेसे वाटते.

माझे बालपण अतिशय त्रासात गेले असे नाही. तेही चारचौघांसारखेच होते. पण त्यावेळी लवकर मोठे होण्याची फ़ार इच्छा होती. आता (वयाने) मोठा झाल्यावर बालपणातल्या आठवणीत कधीकाळी रमायला आवडतं, पण परत लहान होणं? नको रे बाबा... मोठेपण ठेवा देवा...

8 comments:

  1. इतक्या लवकर प्रतिक्रीयेची अपेक्षा नव्हती! धन्यवाद मैथिली. इतरांपेक्षा तुला माझं म्हणणं जास्त पटेल, नाही?

    ReplyDelete
  2. अभिलाष,
    एकदम वेगळाच पैलू मांडलास रे भाई!
    सही!

    ReplyDelete
  3. धन्यवाद विभी! बऱ्याच दिवासांत डोक्यात होता, पण लिहायला वेळ मिळत नव्हता. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  4. ह्म्म्म.. हा निराळाच कोन आहे एकदम.. आवडला..

    ReplyDelete
  5. प्रत्येक वयात फायदे तोटे आहेतच. आणि गंमत म्हणजे त्या त्या टप्प्यात आपण नेमके फक्त तोट्यांकडेच पाहतो, खट्टू होतो. मोठेपणातल्या जबाबदार्‍या, ताण लहानपणी अजिबात दिसत नाही तर जाणवण्याचा सुतरामही संबंध नसतोच. मोठं झाल्यावर ते अतिशय लिमिटेड ताण किती चांगले होते हे जाणवते.

    तू मांडलेला दृष्टिकोन खराच. आवडला.

    ReplyDelete
  6. धन्यवाद भानस! मोठेपणीचे तोटेच नेहमी ऐकण्यात/वाचण्यात आले. फ़ायद्यांबद्दल पण विचार करायला हवा ना. प्रतिक्रियेबद्दल आभार!

    ReplyDelete