Monday, May 10, 2010

काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं


परत एकदा पक पक पकाक बघत होतो. त्यात मधेच एक दु:खी पण अप्रतिम अशी ओळ आहे... "काळाच्या मुठीतूनं, जे बी गेलं निसटूनं, फ़िरून उकरावं, कशापायी?" माझ्या या पोस्टचा आणि चित्रपटातील प्रसंगाचा तसा अर्थार्थी संबंध नाही. मग संदर्भ सोडून हे वाक्य मी का निवडलं? तर काळाच्या मुठीतून जे निसटून गेलं आहे ते परत उकरुन काढण्यासाठी!

आजच्या माहिती तंत्रद्यानाच्या जगात बऱ्याचश्या मागे राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा उकरुन काढता येतात. उदाहर्णार्थ जुन्या जाहिराती. मध्यंतरी "युट्युब" वर वेळ घालवताना अर्थात टि.पी. करताना काय काय सापडलं म्हणून सांगू! गोंडस पारशी मुलाची "जलेबी" वाली धारा तेलाची जाहिरात... अजन्ता घडाळ्याच्या ठोक्याना ताल देणारी आजी.. एशियन पेंटसची जवान सिमेवरून परत येतो आणि आरती घेताना आपल्या मुलाच्या हातावरून हात फ़िरवतो... फ़ेव्हीकॉलच्या जाहिरातीतर विचारायलाच नको! पारले जी ची "हमको पता है जी" वाले आजोबा आणि नातवंडं....इथपासून तर बुलंद भारत की बुलंद तस्वीर.....हमारा बजाज पर्यंत... खोटं वाटेल... पण अक्षरशह: डोळ्यातून पाणी आलं... का ते कळलं नाही. काळच्या ओघात वाहुन गेलेलं निरागस बालपण आठवल्यामुळे असेल कदाचीत....

तर हिप्नोटाईज्ड झाल्यासारखा मी एकामागून एक व्हिडीयोज बघायला लागलो. "एक चिडीया" आणि "मिले सुर मेरा तुम्हारा" बघुन तर लहान मुले कार्टुन बघताना करतात तसा माझा चेहरा झाला होता:) "पूरबसे सुर्य उगा" वाली साक्षरता मिशनची जाहीरात बघून खरच सरकारी माध्यमांचं कौतुक करावसं वाटलं. त्याकाळी मोजकी साधनं असुनही जनजागृतीची ही अप्रतीम जाहिरात त्यानी बनवली होती.

ही पोस्ट केवळ जुन्या जाहिरातींबद्दल नाही. काही जीव्हाळाच्या गोष्टी; ज्यांचा कालांतराने त्या कालबाह्य झाल्याने विसर पडला, त्या उकरुन काढण्यासाठी ही पोस्ट. त्यापैकी काहींची यादी खालील प्रमाणे....

लहान मुलांसाठी असलेलं एकमेव मराठी कॉमिक्स...... "चांदोबा"

डस्टर-पिंजर-खार-कबुतर-ढोली असला "रॉक-पेपर-सिझर" चालीवरचा मराठी खेळ (मी कबुतरला खब्बुतर म्हणत असे कारण खार म्हंटल्यावर कबुतर पेक्षा खब्बुतर म्हणणं सोपं पडे :))

मुलींकरता असलेला खेळ.....भुलाबाई (मी लहान असताना माझ्या बहिणीबरोबर जात असे. भुलाबाईचे गाणे थोडे थोडे अजुनही आठवतात. त्यात अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता.... भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असल्या चालीवर एक यमक जुळणारं गाणं होतं, ते माझं "फ़ेव्हरेट"!)

कंचे (कंचे म्हणजे खेळण्यातले काचेचे मार्बल्स) आणि कंच्यासारख्याच पण पांढऱ्या, दगडी आणि मोठ्या असलेल्या पखांड्या.

अंधळी कोशींबीर... (हि बहुदा अजुनही खेळली जाते)

डोंगराला आग लागली पळा पळा नावाचा एक मैदानी खेळ होता.... तो कसा खेळतात ते आता आठवत नाही :(


आमलेट की चॉकलेट हा ७ चौकट आखुन खेळाला जायचा. त्याची रचना
 खालीलप्रमाणे होती.



क्रमाक्रमाने एक एक रकान्यान दगड टाकत जायचा आणि ज्या रकान्यानत दगड असेल त्या रकान्याशिवाय उरलेल्या रकान्यात लंगडी घालत जायचं आणि परत यायचं. दगड ठरलेल्या रकान्याच्या बाहेर गेला किंवा दोन्ही पाय जमिनीला टेकले की खेळाडू बाद!

उन्हाळ्यात पाहुणे घरी आले कि दुपारी ठरलेला खेळ..... व्यापार आणि पट (होय...तोच शकुनी मामावाला). शिवाय सत्ते लावणी, पाच-तिन-दोन, रमी हे ही होतेच.

पावसाळ्यात मामाच्या गावी एक "खुपसणी" नावाचा खेळ असायचा. लोखंडाची सळाख दुर फ़ेकायची. ओल्या जमिनीमुळे ती आत खुपसायची म्हणून खुपसणी!

युनिसेक्स खेळ.... लगोरी.

सर्वात लोकप्रिय हिंदी कॉमिक्स.... चाचा चौधरी (चाचा चौधरी का दिमाग कॉम्प्युटरसेभी तेज चलता है! :))

दुरदर्शन वरिल गाजलेल्या मालिका..... चंद्रकांता, स्कूल डेज, सॅम और गोपी वाली तहकीकात, पंकज कपूर ची फ़टीचर आणि करमचंद जासुस, अलिफ़ लैला, अफ़साने, इ. इ.

सध्या इतकाच.... तुम्हाला आठवलं असं काही तर मलाही कळवा!

Monday, May 3, 2010

भेटवस्तू

आटपाट नगर होतं. सम्पन्नं, समृद्धं आणि निटनेटकं. नगराचा राजा हा अतिशय गुणी, सज्जन आणि शांतीप्रिय होता. त्याला आपल्या प्रजेवर स्वत:च्या मुलासारखे प्रेम होते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे तो प्रजाजनांचा सांभाळ करत असे. प्रजादेखिल अत्यंतं सुखी होती आणि राजाला देवाप्रमाणे पुजत असे.

राजाचा वाढदिवस होता. संपूर्ण आटपाट नगर फ़ुलांनी सजवण्यात आलं होतं. ठिकठिकाणी राजाच्या सन्मानार्थ कार्यक्रम ठेवले गेले होते. दुरदुरच्या नगरांतून येऊन लोक आपली कला सादर करीत होते आणि राजाकडून भरघोस पारितोषिकं घेऊन जात होते. आपल्या प्रजाजनांचं प्रेम बघून राजाला अगदी भरुन येत होतं.

दिवस मावळत आला होता. राजा आपल्या माहालाकडे निघाला होता. तेवढ्यात वाटेत एक भिकारी राजासमोर आला. शिपायांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण राजाने त्यांना अडवले आणि भिकाऱ्याला आपल्याजवळ बोलावले. दिवसभर भिक मागून मागून तो दमला असल्याचे राजाला लक्षात आले. त्याची झोळी धान्यांनी जवळजवळ पूर्ण भरली होती. तो सकाळपासून राजाला भेटण्याचा प्रयत्न करत होता.

हे ऐकून राजाने एका शिपायाला त्याला १०० सुवर्ण मोहोरा दान देण्यास सांगितले. पण भिकारी म्हणाला, "नाही महाराज, मी दान घेण्यासाठी आपली वाट बघत नव्ह्तो. आज आपला वाढदिवस. आपल्या सारखा राजा या नगरीला लाभला हे आमचं सौभाग्य. आपल्या वाढदिवसानिमीत्त आम्ही आपल्याला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे." हे ऐकून राजाला नवल वाटले. यापुर्वी कुणीही असे काही बोलले नव्हते. प्रजाजनांचीही चूक नव्हती. शेवटी राजाच तो, त्याला प्रजा काय बरं भेटवस्तू देणार?

राजा उत्सुकतेने म्हणाला, "ठिक आहे, पूर्ण दिवस मी इतरांना भेटवस्तू दिल्यात. तु शेवटचा मला भेटतो आहेस, तर तुच मला भेटवस्तू दे." राजाने हात पुढे केले. भिकाऱ्याने आपल्या झोळीतून एक मुठ धान्य राजाच्या हातावर ठेवले. ते पाहून राजाने मंद स्मित केले. तेवढ्यात भिकाऱ्याने पुन्हा आपला हात झोळीत घातला आणि आणखीन एक मुठ राजाच्या हातावर ठेवली. राजा आश्चर्यानी बघायला लागला. त्या झोळीतील धान्य हे कदाचीत त्या भिकाऱ्याचं पुढल्या काही दिवसांचं अन्न होतं. त्यानंतर आणखी एक मुठ, अजुन एक, अजुन एक, धान्य राजाच्या हातातून जमिनीवर सांडायला लागलं. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहु लागले. एक एक करता त्या भिकाऱ्याने आपली संपुर्ण झोळी राजाच्या वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून रिकामी केली आणि तो आपल्या मार्गाने निघुन गेला.

(समाप्त)

=========================================

ता.क.: हि कथा माझी नाही आणि मी ती कुठल्याही ब्लॉगवरूनही उचलली नाही. लहानपणी कधीतरी वर्तमानपत्रातील बालविभागात वाचण्यात आली होती. दिड दशकं जाऊनही ही कथा अकारण माझ्या मनात घर करून बसली. ती पुर्णपणे आठवत नसली तरी शेवट असाच होता.